- पासपोर्ट-व्हिसाची वैधता संपल्यानंतरही पिंपरी-चिंचवडमध्ये बेकायदेशीर वास्तव्यास; विशेष शाखेची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०८ सप्टेंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या नायजेरियन महिलेला पोलिसांनी कारवाई करून तिच्या मायदेशी हद्दपार केले. विशेष शाखेच्या परकीय नागरिक नोंदणी विभागाने ही कारवाई केली.
हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक परदेशी महिला बेकायदेशीरपणे वास्तव्यास असल्याची गोपनीय माहिती परकीय नागरिक नोंदणी विभाग, विशेष शाखा-२ यांना मिळाली होती. त्यानुसार संबंधित महिलेची चौकशी करण्यात आली. तिच्याकडे पासपोर्ट तसेच व्हिसा नसल्याचे आढळून आले.
पोलिसांनी महिलेची बायोमेट्रिक पडताळणी ऑनलाइन DPM System वर केली असता तिचे नाव GIFT OKOH असून ती नायजेरियन नागरिक असल्याची माहिती समोर आली. संबंधित महिला २३ सप्टेंबर २०१४ रोजी मेडिकल व्हिसावर भारतात आली होती. यानंतर ती जयपूर आणि पालघर येथे वास्तव्यास होती. सन २०२४ पासून तिच्या पासपोर्ट आणि व्हिसाची वैधता संपलेली असतानाही ती पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत राहत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
महिलेकडे वैध पासपोर्ट, व्हिसा किंवा इतर आवश्यक कागदपत्रे नसल्याने तिला मायदेशी पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. नायजेरियन हाय कमिशन, नवी दिल्ली यांच्याकडून तिच्यासाठी Emergency Travel Document, तर FRRO मुंबई कार्यालयाकडून Exit Permit मिळविण्यात आला.
त्यानंतर ८ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून संबंधित महिलेला नायजेरियात डिपोर्ट करण्यात आले.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्यावर पुढील काळातही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, डॉ. बसवराज तेली, पोलीस उप आयुक्त धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

















