- शाडू माती व नैसर्गिक साहित्याच्या वापरातून पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०८ सप्टेंबर २०२६) :- गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम आणि उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२६’ आणि ‘माझी वसुंधरा ७.०’ अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.
किवळे येथील श्रीबापदेव महाराज शाळेत आरोग्य विभागाकडून विद्यार्थ्यांसाठी नैसर्गिक गणेशमूर्ती निर्मितीचा उपक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी शाडू माती आणि नैसर्गिक साहित्याचा वापर करून गणेशमूर्ती तयार केल्या.
गणेशोत्सवात पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी मूर्ती तसेच सजावटीसाठी पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सजावटीसाठी कागद, कापड, बांबू, पाने आणि नैसर्गिक फुलांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच थर्माकोल आणि एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत जनजागृती करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या सहभागातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देतानाच पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारावी असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून यावेळी करण्यात आले.

















