- चाकण–निगडी मेट्रोत आळंदी स्थानक, इंद्रायणी प्रदूषण व पवना जलवाहिनीबाबत केंद्राच्या सहकार्याची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०९ सप्टेंबर २०२६) :- पुणे येथे केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री तथा दिशा समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि लांडगे यांनी शहराच्या विकासाशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न मांडले.
प्रस्तावित चाकण–निगडी मेट्रो मार्गिकेत आळंदी स्थानकाचा समावेश करावा, अशी मागणी त्यांनी केली. भक्ती शक्ती–मुकाई चौक–वाकड–नाशिक फाटा–वल्लभनगर–चाकण या ४५.२९ किलोमीटरच्या प्रस्तावित मार्गिकेत ३४ स्थानकांचा समावेश आहे.
इंद्रायणी नदी प्रदूषणाचा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. नदी प्रदूषण रोखण्यासाठी संबंधित महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासकीय यंत्रणांनी समन्वयाने कालबद्ध कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच पिंपरी-चिंचवडच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पातील प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत, यासाठी संयुक्त बैठक घेण्याची विनंती त्यांनी केली.
प्रधानमंत्री आवास योजना, AMRUT 2.0, पीएम स्वनिधी, राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि स्वच्छ वायू कार्यक्रमासह विविध केंद्र पुरस्कृत योजनांचाही आढावा बैठकीत घेण्यात आला. मोहोळ यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाहीच्या सूचना दिल्या.

















