- टपरीधारकांचे पुनर्वसन करण्याची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. 10 सप्टेंबर 2026) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने दिव्यांगांच्या टपऱ्यांवर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने आज गुरुवारी महापालिका भवनात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
दिव्यांगांच्या टपऱ्यांवर कारवाई करताना दुजाभाव करण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला. संबंधित टपऱ्या रस्त्यापासून सुरक्षित अंतरावर असतानाही त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
दिव्यांग नागरिकांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी या टपऱ्या उभारण्यात आल्या होत्या. अचानक केलेल्या कारवाईमुळे दिव्यांग टपरीधारकांचा रोजगार हिरावला गेल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे महापालिकेने संबंधित दिव्यांगांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करावे, अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

















