न्यूज पीसीएमसी नेटवर्क
वाकड (दि. १६ ऑक्टोबर २०२६) :- वाकड परिसरात प्रवासी वाहतूक करण्यासाठी दरमहा पाच हजार रुपयांचा हप्ता मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हप्ता न दिल्यास मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार एका कारचालकाने वाकड पोलिसांकडे केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी शुभम विशाल दुधभाते (वय २८, रा. वाकड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवराज म्हाळाप्पा हेगडे (वय ३०, व्यवसाय चालक, रा. भोसरी) हे १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास आपली इर्टिगा कार घेऊन भुजबळ चौकातील डॉल्फिन ट्रॅव्हल्सच्या कार्यालयासमोरील रस्त्यावर थांबले होते. त्यावेळी आरोपीने त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली.
तसेच, वाकड ब्रिज परिसरातून प्रवासी घेऊन जायचे असल्यास दरमहा पाच हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याबाबत पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकीही आरोपीने दिल्याचा आरोप आहे. यापूर्वी आरोपीने धमकावून रोख आणि ऑनलाइन पद्धतीने दहा ते बारा हजार रुपये घेतल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी १५ ऑक्टोबर रोजी पहाटे १ वाजून ५६ मिनिटांनी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक कारंडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


















