- उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती; शेखर चिंचवडे युथ फाउंडेशनचा उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. १५ ऑक्टोबर २०२६) :- नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन, नवयुग तरुण मित्र मंडळ, मल्हार छावा प्रतिष्ठान आणि राजमाता जिजाऊ महिला बचत गट महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी भव्य गरबा व दांडिया उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाला महिलांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा आणखी वाढली.
नवरात्रोत्सव म्हणजे आदिशक्ती आई जगदंबेच्या भक्तीचा, शक्तीचा, संस्कृतीचा आणि उत्साहाचा मंगलमय सोहळा. याच भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उत्सवात महिलांनी गरबा आणि दांडियाचा आनंद घेतला. धार्मिक श्रद्धा आणि सांस्कृतिक परंपरेचा सुंदर संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला.
या कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर शर्मिलाताई बाबर, माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक विठ्ठल नाना काटे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पीसीएमटीचे माजी सभापती सुरेश तात्या चिंचवडे, चंद्रहास अण्णा वाल्हेकर, कैलासशेठ आहेर, आबा सोनवणे आणि खानदेशचे युवा नेते माऊली जगताप यांच्यासह चिंचवडे परिवारातील सदस्य, प्रभागातील ज्येष्ठ नागरिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी देवीच्या आरतीचा मान स्वीकारत उत्सवात सहभाग नोंदवला. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. महिलांना एकत्र आणून धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाला उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढविणाऱ्या सर्व मान्यवरांचे आणि नागरिकांचे आयोजकांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

















