न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १७ ऑक्टोबर २०२६) :- मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यावर पाळत ठेवल्याचा आरोप असलेल्या सुनील रघुनाथ गुजर यांना पुण्यातील बंडगार्डन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात आमदार शेळके आणि गुजर यांनी एकमेकांविरोधात तक्रारी केल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
आमदार शेळके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गुजर हे स्वतःला माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून सांगत असून, शासनाचे बोगस ओळखपत्र वापरणे, नागरिकांना धमकावणे आणि पैशांची मागणी करणे असे प्रकार करत असल्याचा आरोप आहे. तसेच, १६ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले असताना गुजर यांनी त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक स्वरूपाच्या संवेदनशील माहितीबाबत अन्य व्यक्तींच्या नावाने अर्ज करून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे. गुजर हे अनेक दिवसांपासून आमदारांच्या कार्यालयात आणि नियोजित कार्यक्रमांच्या ठिकाणी येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यांच्याकडे आढळलेल्या दोन मोबाइल फोनमधील कॉल रेकॉर्ड तपासून सखोल चौकशी करण्याची मागणी शेळके यांनी पोलिसांकडे केली आहे.
दरम्यान, गुजर यांनी आमदार शेळके यांच्या खाणींच्या रॉयल्टीसंदर्भातील कथित गैरव्यवहाराची माहिती माहिती अधिकारातून मिळवल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील एका खोलीत बंद करून मारहाण केल्याचा आरोप केला आहे. अवैध खाणी, एमआयडीसीच्या जमिनींची अदलाबदल आणि रॉयल्टीच्या कथित गैरव्यवहाराबाबतही त्यांनी आरोप केले आहेत. मात्र, हे आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्याचे सांगितले. संबंधित व्यक्तीने मारहाण झाल्याचा दावा केला असला, तरी असा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोलिसांकडून या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.

















