न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १७ ऑक्टोबर २०२६) :- शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात उभारण्यात येणाऱ्या स्ट्राँगरूमच्या सुरक्षेचा पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून आढावा घेण्यात आला. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्ट्राँगरूमला भेट देऊन परिसराची पाहणी केली. निवडणूक प्रक्रिया सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्यासाठी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
भारत निवडणूक आयोगाने २२ सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान, तर २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने २२ सप्टेंबरपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
पुणे विभागातील शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात स्ट्राँगरूम आणि मतमोजणीची व्यवस्था करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर स्ट्राँगरूमची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) बसवराज तेली, सर्व पोलीस उपायुक्त तसेच परिमंडळ दोनमधील पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी यांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली.
स्ट्राँगरूमच्या सुरक्षेसाठी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था उभारण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. तसेच प्रवेशद्वारांवर डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर (DFMD), हँड हेल्ड मेटल डिटेक्टर (HHMD) आणि सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याबाबत सूचना करण्यात आल्या.
मतमोजणीही याच ठिकाणी होणार असल्याने स्ट्राँगरूम परिसरातील वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी पोलीस उपायुक्त (वाहतूक) यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक शांततापूर्ण, निर्भय, मुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.


















