- विनापरवाना बाईक टॅक्सी चालवल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांत गुन्हा..
- रिक्षा चालकांना दिलासा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १७ ऑक्टोबर २०२६) :- पुणे शहरात विनापरवाना बाईक टॅक्सी सेवा चालवल्याप्रकरणी रॅपिडो (रोपेन ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड) कंपनीविरोधात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईचे महाराष्ट्र रिक्षा पंचायतीने स्वागत केले असून, संघटनेच्या सातत्यपूर्ण कायदेशीर लढ्याला यश मिळाल्याची प्रतिक्रिया संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी व्यक्त केली.
पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (RTA) यापूर्वीच रॅपिडोचा परवाना अर्ज फेटाळला होता. तसेच, १५ ऑक्टोबर रोजी पुणे जिल्हाधिकारी तथा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत परवाना मिळेपर्यंत पुणे जिल्ह्यात बाईक टॅक्सी सेवा बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, कंपनीकडून सेवा सुरू असल्याचा आरोप महाराष्ट्र रिक्षा पंचायतीने केला आहे.
या पार्श्वभूमीवर, १६ ऑक्टोबर रोजी परिवहन विभागाने विश्रांतवाडी परिसरात कारवाई केली. यावेळी विनापरवाना तसेच खासगी वापरासाठी नोंदणी केलेल्या (व्हाइट प्लेट) दुचाकीवरून प्रवासी वाहतूक केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करून संबंधित वाहन जप्त करण्यात आले. या प्रकरणी मोटार वाहन कायदा, भारतीय न्याय संहिता (BNS) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे संघटनेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
रिक्षा चालकांच्या संघर्षाला यश : डॉ. बाबा कांबळे…
या कारवाईचे स्वागत करताना डॉ. बाबा कांबळे म्हणाले की, रॅपिडोसारख्या कंपन्यांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे परवाना, बॅच आणि परमिट घेऊन कायदेशीररीत्या व्यवसाय करणाऱ्या हजारो रिक्षा चालकांच्या उदरनिर्वाहावर परिणाम होत होता. खासगी नोंदणीच्या दुचाकींवरून प्रवासी वाहतूक करणे नियमबाह्य असल्याची भूमिका संघटनेने सातत्याने मांडली होती. पाठपुरावा आणि कायदेशीर लढ्यामुळे प्रशासनाने कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले.
या कारवाईमुळे अनधिकृत प्रवासी वाहतुकीला आळा बसेल आणि नियमांचे पालन करून व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा महाराष्ट्र रिक्षा पंचायतीने व्यक्त केली आहे.

















