- पिंपरी-चिंचवड पोलिसांची २०२६ मधील दुसरी कारवाई; सहा आरोपींना अटक, २८ लाख रुपये परत मिळण्याचा मार्ग मोकळा
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १७ ऑक्टोबर २०२६) :- बनावट ट्रेडिंग अॅपद्वारे शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ८६ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या संघटित सायबर गुन्हेगारी टोळीविरुद्ध पिंपरी-चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत कारवाई केली आहे. सन २०२६ मधील सायबर गुन्हेगारांविरुद्धची ही दुसरी मकोका कारवाई असून, या प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. फसवणुकीच्या रकमेतून गोठवलेले २८ लाख रुपये तक्रारदाराला परत मिळण्यासाठी न्यायालयाकडून आदेशही प्राप्त झाले आहेत.
१७ जुलै २०२६ रोजी सायबर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींनी बनावट ट्रेडिंग अॅप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळेल, असे आमिष दाखवले होते. त्यानंतर तक्रारदाराकडून ८६ लाख रुपये उकळण्यात आले. फसवणुकीची रक्कम विविध बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी पुणे, लातूर, अहिल्यानगर, नवी मुंबई आणि हैदराबाद येथून सहा आरोपींना अटक केली. त्यामध्ये तेजस ज्ञानोबा लोखंडे (२४), अविनाश ज्ञानोबा बाकलिकर (२८), हर्षल दिलीप बोरा (३४), सोनू हरिष शर्मा (२१), अॅलेक ऊर्फ गौरव रमेश गाडगे (२४) आणि आखील श्रीनिवासराव नेल्लुरी (२४) यांचा समावेश आहे. या आरोपींचे कंबोडियातील मुख्य आरोपीशी संपर्क असल्याचे तपासात समोर आले असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिसांच्या तपासानुसार, या टोळीने संघटित पद्धतीने सायबर फसवणुकीचे जाळे उभारले होते. सोशल मीडियावर आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांना गुंतवणुकीस प्रवृत्त केले जात होते. फसवणुकीतून मिळालेली रक्कम यूएसडीटीसारख्या आभासी चलनात वर्ग केली जात असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. या टोळीतील आरोपींनी पिंपरी-चिंचवड, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर तसेच गुजरातमध्ये फसवणूक, अपहरण, खंडणी, दरोडा, अमली पदार्थांची तस्करी आणि बनावट कागदपत्रे तयार करण्यासारखे गुन्हे केल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
आरोपी संघटित गुन्हेगारी टोळी तयार करून आर्थिक फायद्यासाठी गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड यांनी या प्रकरणात मकोका कायद्याच्या कलम ३(१)(ii) आणि ३(४) चा समावेश करण्याचे आदेश दिले. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त (सायबर व आर्थिक गुन्हे) रोहिणी बानकर करत आहेत.


















