- तळेगाव दाभाडे येथील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळेगाव दाभाडे (दि. १७ ऑक्टोबर २०२६) :- पतीच्या कथित अनैतिक संबंधांबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेला शिवीगाळ करून तिच्यावर लोखंडी कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना तळेगाव दाभाडे येथील कडोळकर कॉलनीत घडली. या हल्ल्यात महिलेच्या उजव्या डोळ्याच्या भुवईजवळ आणि पापणीच्या वरच्या बाजूला दुखापत झाली आहे. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी महिलेच्या पतीचे आरोपी महिलेशी कथित अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून फिर्यादी महिला आरोपीच्या पतीला याबाबत सांगण्यासाठी तिच्या घरी गेली होती.
यावेळी या कारणावरून संतप्त झालेल्या आरोपी महिलेने फिर्यादीला शिवीगाळ केली. त्यानंतर लोखंडी कोयत्याने तिच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने हा वार चुकवला; मात्र कोयत्याचे पुढील टोक तिच्या उजव्या डोळ्याच्या भुवईजवळ आणि पापणीच्या वरच्या बाजूला लागल्याने ती जखमी झाली. यानंतर आरोपी महिलेने फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी १६ ऑक्टोबर रोजी पहाटे २ वाजून ४६ मिनिटांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिलेला भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ३५(३) अन्वये नोटीस देण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार काठे करीत आहेत.

















