- पदवीधर निवडणुकीत एकजुटीचे आव्हान; महायुतीत समन्वयाचा अभाव?..
- राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपवर रोष…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १८ ऑक्टोबर २०२६) :- पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपने डॉ. स्मिता योगेश जाधव यांना उमेदवारी दिल्यानंतर महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या नाराजीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. उमेदवारी आणि जागावाटपाच्या निर्णयावरून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेली नाराजी डॉ. जाधव यांच्या प्रचारातील समन्वयासाठी आव्हान ठरणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या प्रचार समन्वयासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर कार्यालयात झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. ‘आमची हक्काची जागा तुम्ही घेतली, उमेदवार जाहीर करताना विश्वासात घेतले नाही, अर्ज भरताना बोलावले नाही, प्रचाराचा शुभारंभ करतानाही आम्हाला विचारले नाही. मग आम्ही स्वतःहून येऊन तुमच्याकडे बघत राहायचे का?’ अशा शब्दांत पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडत ‘आमचे अर्थखाते आम्हाला परत द्या,’ अशी मागणीही करण्यात आली.
या बैठकीला भाजपचे नेते व उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे नेते व कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह दोन्ही पक्षांचे आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष सुनील टिंगरे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष योगेश बहल, जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर आणि राजेंद्र कोरेकर यांनी प्रचाराच्या नियोजनात विश्वासात घेतले जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी दत्तात्रय भरणे यांनी सर्वांनी एकत्रितपणे निवडणुकीत काम करण्याचे आवाहन केले. चंद्रकांत पाटील यांनीही नाराजी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. मात्र, जागावाटपाच्या निर्णयावरून निर्माण झालेला असंतोष प्रत्यक्ष प्रचारात कितपत दूर होतो, हे महत्त्वाचे ठरणार आहे. पुणे पदवीधरची जागा यापूर्वी राष्ट्रवादीकडे असल्याचा दावा आणि ती भाजपकडे गेल्यानंतर पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली नाराजी या पार्श्वभूमीवर डॉ. स्मिता जाधव यांच्या प्रचारासाठी महायुतीतील सर्व घटक पक्ष एकदिलाने काम करतात का, याकडे लक्ष लागले आहे. भाजपला उमेदवाराच्या प्रचाराबरोबरच मित्रपक्षातील नाराजीचेही व्यवस्थापन करावे लागणार आहे.
”बैठकीत आमच्या काही पदाधिकाऱ्यांनी ‘पदवीधरची जागा आमची होती, ती आम्हालाच मिळायला हवी होती’, अशी भूमिका मांडली. महायुतीत आम्ही महायुतीचे घटक आहोत का? असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे. भाजपकडून आम्हाला दुजाभावाची वागणूक मिळतेय. महापालिकेत देखील आम्हाला सोबत घेतले जात नाही. आम्ही नावासाठी महायुतीत आहोत का? जशी आज निवडणुकीसाठी बैठक घेतली,तशीच दर तीन महिन्यांनी महायुतीची बैठक घ्यावी. पाटील कुटुंबीयांनी शहरात शिक्षणाचे जाळे निर्माण केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन आम्ही नक्कीच त्यांच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहू”.
– योगेश बहल, शहराध्यक्ष – राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, पिंपरी चिंचवड शहर…

















