न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चऱ्होली (दि. २१ ऑक्टोबर २०२६) :- सध्या पाणीटंचाई सुरू असल्याने गाड्या धुताना पाण्याचा कमीत कमी वापर करावा, असे सांगितल्याचा राग आल्याने पाच जणांनी रहिवाशांना शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना चऱ्होली खुर्द येथील अभिमानश्री सोसायटीच्या पार्किंगमध्ये घडली. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास थोरवे वस्ती, चऱ्होली खुर्द येथील अभिमानश्री सोसायटीच्या पार्किंगमध्ये घडली. याप्रकरणी राहुल माधवराव शिपाळे (वय ३३) यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपी सचिन कोठावडे (वय ४६), विवेक कोठावडे (वय १८), कुणाल कोठावडे (वय २०), आशिष भालेराव (वय २८) आणि गणेश धापांडे (वय २२, सर्व रा चऱ्होली ) हे सोसायटीच्या बोअरवेलच्या पाण्याला पाइप लावून गाड्या धुत होते.
त्यावेळी जखमी निलेश चव्हाण यांनी सध्या पाणीटंचाई सुरू असल्याने सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर पाइप लावून गाड्या धुऊ नयेत, असा संदेश दिल्याचे सांगितले. गाड्या धुवायच्या असतील तर बादलीत पाणी घेऊन कमीत कमी पाण्याचा वापर करावा, असेही त्यांनी सांगितले. मात्र, यावरून आरोपींनी संतापून फिर्यादी राहुल शिपाळे, निलेश शिवाजी चव्हाण आणि प्रांजय तानाजी भालेराव (वय ३५) यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तसेच बादलीने डोक्यात मारल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काकडे करीत आहेत.


















