न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळेगाव दाभाडे (दि. २१ ऑक्टोबर २०२६) :- व्हॉट्सॲपवर ठेवलेल्या स्टेटसचा राग मनात धरून तिघांनी कापड दुकानात काम करणाऱ्या तरुणावर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना तळेगाव दाभाडे येथील शिवाजी चौकात घडली. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तीन विधिसंघर्षग्रस्त बालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास शिवाजी चौकातील ‘आफ्ट लुक’ या कापड दुकानात घडली. फिर्यादी हे या दुकानात काम करत होते. त्यावेळी त्यांच्या ओळखीचे तीन जण दुकानात आले. त्यापैकी एका विधिसंघर्षग्रस्त बालकाने जीन्स पॅन्ट खरेदी करायची असल्याचे सांगितले. फिर्यादी पॅन्ट दाखविण्यासाठी मागे वळले असता, संबंधित बालकाने जवळील कोयत्याने त्यांच्या डोक्यावर आणि मानेवर वार केले.
दरम्यान, १९ ऑक्टोबर रोजी प्रशांत शिंगाडे खून प्रकरणात बालसुधारगृहातून सुटल्यानंतर फिर्यादी यांच्या मामाचा मुलगा सिद्धार्थ संतोष कांबळे आणि त्याचा मित्र प्रतीक बाळू तातळे यांनी व्हॉट्सॲपवर ‘किंग इज’ असे स्टेटस ठेवल्याचा राग आरोपींच्या मनात होता, असे फिर्यादीत नमूद आहे.
हल्ल्यातून बचाव करण्यासाठी फिर्यादी दुकानाबाहेर पळत असताना अन्य दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांनी त्यांना जिवंत सोडू नको, असे सांगितल्याचा आरोप आहे. त्यानंतर पहिल्या बालकाने पुन्हा जिवे मारण्याच्या उद्देशाने वार करून फिर्यादीला गंभीर जखमी केले.
या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक वाघुले करीत आहेत.


















