- राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रविण पिंजण यांची महापौर, आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २२ ऑक्टोबर २०२६) :- पुणे महानगरपालिकेच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेनेही दिवाळीनिमित्त शहरस्तरीय भव्य ऐतिहासिक किल्ले स्पर्धा व प्रदर्शन आयोजित करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या भोसरी विधानसभा सेवादलाचे अध्यक्ष प्रविण शंकर पिंजण यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महापौर, महापालिका आयुक्त आणि विरोधी पक्षनेते यांना निवेदन दिले आहे.

पुणे महानगरपालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत अनेक वर्षांपासून ऐतिहासिक किल्ले स्पर्धा व प्रदर्शन आयोजित केले जाते. या उपक्रमातून विद्यार्थी, युवक आणि नागरिकांना महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांची माहिती मिळते. याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहरातही दरवर्षी अशा स्पर्धेचे आयोजन करावे, असे पिंजण यांनी निवेदनात म्हटले आहे.
पिंपरी-चिंचवड हे औद्योगिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या विकसित शहर असून, येथील शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळे आणि युवकांना या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळावी. यामुळे ऐतिहासिक वारशाचे संवर्धन होण्यास मदत होईल, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
आठही क्षेत्रीय कार्यालयांमधील सहभागाला प्रोत्साहन द्या…
महापालिकेच्या सांस्कृतिक आणि उद्यान विभागामार्फत दरवर्षी ही स्पर्धा आयोजित करावी. शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळे आणि नागरिकांसाठी स्वतंत्र स्पर्धा गट तयार करावेत. किल्ल्यांची ऐतिहासिक अचूकता, कलात्मक मांडणी, पर्यावरणपूरक साहित्य आणि माहितीपूर्ण सादरीकरण या निकषांवर परीक्षण करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके, सन्मानचिन्हे आणि प्रमाणपत्रे देण्यासह महापालिकेच्या अर्थसंकल्पात स्वतंत्र आर्थिक तरतूद करावी. स्पर्धेसाठी मध्यवर्ती ठिकाण निश्चित करून आवश्यक जागा, पाणी, वीज, स्वच्छता आणि सुरक्षेच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही पिंजण यांनी सुचविले आहे.
स्वराज्याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचणार…
छत्रपती शिवाजी महाराजांचे गड-किल्ले, स्वराज्याचा इतिहास, गडसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षण यांची माहिती देणारे विशेष प्रदर्शन आयोजित करावे. शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांना आणि मंडळांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. या उपक्रमाला महापालिकेच्या वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये कायमस्वरूपी स्थान द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
ऐतिहासिक किल्ले तयार करण्याची परंपरा ही केवळ दिवाळीपुरती मर्यादित नसून, नव्या पिढीला महाराष्ट्राच्या इतिहासाशी जोडणारी सांस्कृतिक चळवळ आहे. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची आवड, संशोधनवृत्ती, कलात्मकता, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित होण्यास मदत होईल, असे पिंजण यांनी नमूद केले आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने सन २०२६ पासून शहरस्तरीय ऐतिहासिक किल्ले स्पर्धा व प्रदर्शन सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन संबंधित विभागांना आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.


















