- डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक उपायुक्त कार्यालयात बैठक..
- आरटीओ आणि वाहतूक विभागाच्या संयुक्त मोहिमेचे आश्वासन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड, दि. २२ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना आणि नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या ऑनलाइन टू-व्हीलर टॅक्सी सेवांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिल्याचा दावा महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची गुरुवारी (दि. २२) दुपारी १२.३० वाजता पोलीस उपायुक्त (वाहतूक) कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत विनापरवाना टू-व्हीलर टॅक्सींचा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
या बैठकीला सहायक पोलीस आयुक्त डॉ. विक्रांत देशमुख आणि पोलीस निरीक्षक अमित धुमाळ उपस्थित होते. शहरात नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या टू-व्हीलर टॅक्सी सेवांवर प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) आणि वाहतूक पोलिसांच्या संयुक्त मोहिमेद्वारे कारवाई करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली.
वाकडमधील प्रकाराचा मुद्दा उपस्थित
वाकड परिसरात नेपाळमधील एका नागरिकाकडे वैध कागदपत्रे आणि व्यावसायिक परवाना नसतानाही तो टू-व्हीलर टॅक्सी चालवत असल्याचा आरोप स्थानिक ऑटोरिक्षा आणि कॅब चालकांनी केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली.
चालकांच्या पडताळणीचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईतील जुहू परिसरातील गोळीबाराच्या घटनेचा संदर्भ देत ऑनलाइन टू-व्हीलर टॅक्सी सेवांशी संबंधित चालकांची पार्श्वभूमी पडताळणी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दाही बैठकीत मांडण्यात आला. चालकांची पोलीस पडताळणी तसेच वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी प्रभावीपणे होणे आवश्यक असल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले.
संयुक्त कारवाईची मागणी
विनापरवाना आणि नियमबाह्य टू-व्हीलर टॅक्सी सेवांविरोधात तातडीने कारवाई करण्यासाठी आरटीओ आणि वाहतूक विभागाने संयुक्त विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली. प्रशासनाने या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा करून कठोर कारवाईचे आश्वासन दिल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या बैठकीला राजन नायर, कलिंदर शेख, शुभम तांदळे, अनिल शिरसाट, धनंजय कुदळे, विशाल ससाने, रंजीत शहा, बापू कांबळे, अमोल शिंदे, सोमनाथ तिकोटे, संभाजी सावंत, अरुण कांबळे, अशोक जगताप आणि ज्ञानेश्वर कदम यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
रिक्षा-टॅक्सी चालकांच्या न्याय्य भाड्याची मागणी
“रॅपिड कंपनीने बेकायदेशीरपणे सुरू केलेली टू-व्हीलर टॅक्सी सेवा बंद झालीच पाहिजे आणि ऑटो-टॅक्सी चालकांना शासकीय दराप्रमाणे न्याय्य भाडे मिळालेच पाहिजे,” असा ठाम इशारा महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्ष शुभम तांदळे यांनी दिला. या मागण्यांसाठी संघटनेचा लढा सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


















