- खंडणी विरोधी पथकाची धडक कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २२ ऑक्टोबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. खंडणी विरोधी पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कारवाई करत ५० हजार रुपये किमतीचे एक लोखंडी पिस्तूल जप्त केले. या प्रकरणी दोन तरुणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यासह अन्य एका आरोपीविरुद्ध दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार खंडणी विरोधी पथकातील पोलीस हवालदार चंद्रकांत जाधव, पोलीस शिपाई निलेश जाधव आणि संदीप गंगावणे यांना रेकॉर्डवरील आरोपी यश अनिल शिंदे आणि प्रज्वल सुधीर जाधव यांच्याकडे अवैध शस्त्र असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी २२ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री सुमारे १२.४० वाजता नाणेकरवाडी येथील माऊली पार्कच्या कमानीजवळ, एमआयडीसी रोड परिसरात सापळा रचून यश अनिल शिंदे (वय २२, रा. आंबेगाव, जि. पुणे) आणि प्रज्वल सुधीर जाधव (वय २२, रा.आंबेगाव, जि. पुणे) यांना ताब्यात घेतले.
पिस्तूल मित्राकडून मिळाल्याची माहिती
तपासादरम्यान यश शिंदे याच्याकडून ५० हजार रुपये किमतीचे लोखंडी पिस्तूल जप्त करण्यात आले. या पिस्तुलाबाबत चौकशी केली असता, ते प्रज्वल जाधव याने दिल्याचे यशने सांगितले. त्यानंतर प्रज्वल जाधव याच्याकडे चौकशी केली असता, त्याचा मित्र फारूख अन्सार पठाण (वय २५, रा. चाकण) याने पिस्तूल दिल्याचे त्याने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी यश शिंदे, प्रज्वल जाधव आणि फारूख पठाण या तिघांविरुद्ध दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ताब्यात घेतलेल्या दोघांची वायसीएम रुग्णालय, पिंपरी येथे वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर दोन्ही आरोपी आणि जप्त केलेले पिस्तूल पुढील तपासासाठी दक्षिण चाकण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. संबंधित आरोपींविरुद्ध यापूर्वीही शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल असून, ते सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड, सुनिल कानगुडे, अभिमन्यू बनसोडे, चंद्रकांत जाधव, निलेश जाधव आणि संदीप गंगावणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.


















