- मानकर चौकाकडून छत्रपती चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना बंदी..
- पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २२ ऑक्टोबर २०२६) :- वाकड येथील प्रभाग क्रमांक २६ मध्ये छत्रपती चौक ते मानकर चौक या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. या कामामुळे वाहतूककोंडी होत असून, रस्त्याचे काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी मानकर चौकाकडून छत्रपती चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागाने केले आहे.
छत्रपती चौकापासून मानकर चौकाजवळील सोनिगरा सोसायटीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. मात्र, सोनिगरा सोसायटी ते मानकर चौक या दरम्यानचे काम अद्याप बाकी आहे. या ठिकाणी वाहनांच्या वर्दळीमुळे कामात अडथळे निर्माण होत असून, कामास विलंब होत आहे. तसेच परिसरात वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे.
या पार्श्वभूमीवर पोलीस उपआयुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड यांच्या दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या अधिसूचनेनुसार वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. हे बदल १३ ऑक्टोबर २०२६ पासून लागू करण्यात आल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. रस्त्याचे काँक्रीटीकरण वेळेत पूर्ण व्हावे आणि वाहतूक व्यवस्थेत अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता (स्थापत्य) सुनील शिंदे, ज क्षेत्रीय कार्यालय (रायगड), पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांनी केले आहे.
असे असतील पर्यायी मार्ग…
१. मानकर चौकाकडून छत्रपती चौकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पुढे कस्पटे कॉर्नर चौकातून इच्छित स्थळी जावे.
२. मानकर चौकाकडून यू-टर्न घेऊन कस्पटे चौक मार्गे इच्छित स्थळी जाता येईल.

















