- कंपनीकडून अद्यापही मदतीची प्रतिक्षा..
- राज्य शासनाच्या मदतीबाबतही संभ्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २३ ऑक्टोबर २०२६) :– मोशी कचरा डेपो दुर्घटनेत कुटुंबातील कर्ता पुरुष गमावलेल्या नातेवाईकांचा आर्थिक मदतीसाठीचा संघर्ष अद्याप सुरू असल्याची व्यथा त्यांनी व्यक्त केली. महापालिकेकडून आर्थिक मदत मिळाली; मात्र कंपनीकडून अद्याप कोणतीही मदत मिळाली नसल्याचा दावा मृत कामगारांच्या नातेवाईकांनी केला. राज्य शासनाच्या मदतीबाबतही संभ्रम कायम असल्याने दिवाळीच्या तोंडावर या कुटुंबीयांसमोर आर्थिक संकट उभे राहिल्याचे त्यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आवारात पत्रकारांची चर्चा सुरू असताना मृत कामगारांचे भाऊ, पत्नी आणि अन्य नातेवाईक तेथे आले. त्यांनी आपली व्यथा मांडताना कंपनीकडून मदत मिळाली नसल्याचे सांगितले. राज्य शासनाने आर्थिक मदतीचे आश्वासन दिले होते. त्यासाठी तहसीलदार कार्यालयाकडे पाठपुरावा केला असता, महापालिकेने दिलेली मदत हीच राज्य शासनाची मदत असल्याचे सांगण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
‘घरातील आधार गेला आहे. दिवाळी आली, पण घर कसे चालवायचे आणि मुलाबाळांचे भविष्य कसे घडवायचे, हा प्रश्न आमच्यासमोर आहे. मदतीसाठी पाठपुरावा करूनही स्पष्ट उत्तर मिळत नाही. आम्ही आता काय करायचे?’ अशी व्यथा नातेवाईकांनी व्यक्त केली.
आयुक्तांना निवेदन; मुलाबाळांसह उपोषणाचा इशारा…
आर्थिक मदतीबाबत स्पष्टता मिळावी, यासाठी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. न्याय न मिळाल्यास आयुक्तांसह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या दालनात मुलाबाळांसह उपोषणाला बसण्याचा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, कंपनीकडून किती मदत प्रत्यक्षात देण्यात आली आणि राज्य शासनाच्या मदतीबाबत काय निर्णय झाला, या दाव्यांची स्वतंत्र पडताळणी होणे आवश्यक आहे. नातेवाईकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर प्रशासन काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.

















