- गरजू नागरिकांना मोफत कायदेविषयक मार्गदर्शन..
- सामाजिक आणि पर्यावरणविषयक उपक्रमही राबविणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २३ ऑक्टोबर २०२६) :- भारतीय संविधानातील मूलभूत हक्क, कर्तव्ये आणि विविध कायद्यांविषयी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासह गरजू व्यक्तींना मोफत कायदेविषयक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी संविधान विधीसेवा मंचाने पुढाकार घेतला आहे. संपूर्ण महाराष्ट्र हे संस्थेचे कार्यक्षेत्र असून, कायदेविषयक साक्षरता वाढविणे आणि न्यायप्रक्रियेची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे, हा संस्थेचा प्रमुख उद्देश आहे.
संस्थेच्या माध्यमातून गरीब व गरजू नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, कामगार, शेतकरी, विद्यार्थी आणि समाजातील दुर्बल घटकांना मोफत कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन दिले जाणार आहे. विविध कायदे, शासनाचे नियम, न्यायालयीन प्रक्रिया तसेच नागरी व फौजदारी कायद्यांविषयी माहिती देण्यासाठी सल्ला शिबिरे, व्याख्याने, चर्चासत्रे आणि कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे.
नागरिकांना अर्ज, तक्रारी, प्रतिज्ञापत्रे आणि निवेदने तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार असून, लोकअदालत, मध्यस्थी व समुपदेशन यांसारख्या पर्यायी वाद निवारण पद्धतींचा प्रसारही केला जाणार आहे. कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच कायदेविषयक पुस्तके व माहितीपर साहित्य प्रकाशित करण्याचे नियोजन आहे.
न्याय, समानता आणि मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी विविध उपक्रम राबविण्याबरोबरच वृक्षलागवड, पर्यावरण संरक्षण, सार्वजनिक स्वच्छता, प्लॅस्टिकमुक्ती, कचरा व्यवस्थापन, रक्तदान आणि पाणी बचतीबाबत जनजागृती केली जाणार आहे. नैसर्गिक आपत्तींच्या काळात बाधितांना मदत करणे तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणे, या उपक्रमांचाही संस्थेच्या कार्यात समावेश आहे.
संस्थेची कार्यकारिणी…
संविधान विधीसेवा मंचाच्या अध्यक्षपदी अॅड. गोरखनाथ गेनबा झोळ यांची निवड करण्यात आली आहे. कार्याध्यक्षपदी अॅड. सत्यनारायण बन्सीलाल चांडक आणि अॅड. प्रशांत दिलीप भागवत यांचा समावेश आहे. उपाध्यक्षपदी अॅड. विजया दिलीप भांडवलकर आणि अॅड. रावसाहेब आप्पासाहेब करपे, सचिवपदी अॅड. पल्लवी प्रकाश विघ्ने, सहसचिवपदी अॅड. पूनम सतीश स्वामी, तर कोषाध्यक्षपदी अॅड. संजय रामचंद्र काकडे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
कार्यकारिणी सदस्य म्हणून अॅड. प्रियंका महेश आरुडे, अॅड. अमोल विलास जाधव, अॅड. प्रदीप रमेश रनवरे, अॅड. दिलीप काळुराम करंडे, अॅड. प्रफुल्ल मच्छिंद्रनाथ टिळेकर, अॅड. सुधाकर एकनाथ आव्हाड आणि अॅड. अमोल शेषराव पटाईत यांचा समावेश आहे.
“संविधानातील मूल्ये समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविणे, प्रत्येक नागरिकाला त्याच्या हक्कांची आणि कर्तव्यांची जाणीव करून देणे, तसेच गरजू व्यक्तींना न्याय मिळविण्याच्या प्रक्रियेत योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, हा संविधान विधीसेवा मंचाचा मुख्य उद्देश आहे,” असे संस्थेचे अध्यक्ष अॅड. गोरखनाथ झोळ यांनी सांगितले.


















