न्यूज पीसीएमसी नेटवर्क
हिंजवडी (दि. २३ ऑक्टोबर २०२६) :- पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी ठामपणे लढणाऱ्या सक्षम उमेदवाराला पाठिंबा देण्याचे आवाहन आम आदमी पार्टीच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविराज काळे यांनी केले. त्यांनी हिंजवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी बोलताना रविराज काळे म्हणाले की, पदवीधरांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आणि त्यांच्या हिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी सक्षम लोकप्रतिनिधी निवडून देणे आवश्यक आहे. सरकारच्या धोरणांविरोधात आपली भूमिका मांडण्याबरोबरच पदवीधरांच्या हक्कांसाठी आवाज उठविणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी मतदारांनी उभे राहिले पाहिजे.
पदवीधर मतदारसंघातील निवडणूक ही सुशिक्षित मतदारांसाठी आपल्या प्रश्नांना वाचा फोडण्याची महत्त्वाची संधी आहे. त्यामुळे राज्यातील सर्व पदवीधर मतदारांनी मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन लोकशाही बळकट करण्यासाठी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहनही काळे यांनी केले.


















