- सांगवीतील संविधान शिल्पाची मोडतोड भोवली..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
सांगवी (दि. २३ ऑक्टोबर २०२६) :- महापालिकेच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांच्या मुद्द्यावरून सांगवी परिसरात वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी माजी नगरसेवकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या कारवाईवरून काँग्रेसने भाजप नेत्यांवर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे.
सांगवी परिसरातील संविधान चौकातील शिल्प, गोलाकार भिंत आणि चौथऱ्याच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामावरून हा वाद निर्माण झाल्याचे समोर आले आहे. संबंधित कामासाठी महापालिकेच्या स्थापत्य विभागाने कंत्राटदाराला काम दिले होते. मात्र, या कामाच्या प्रक्रियेवर आणि अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून वादाला तोंड फुटले.
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याच्या कारणावरून संबंधितांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी माजी नगरसेवक संतोष कांबळे यांच्या सह जेसीबी चालक-मालक आणि मजुरावर या तिघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
दरम्यान, या प्रकरणावर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. संविधान चौकातील शिल्प आणि चौथऱ्याच्या कामासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याऐवजी राजकीय दबावातून कारवाई करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. तसेच, महापालिका प्रशासन आणि संबंधित विभागाच्या कामकाजावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
काँग्रेसने भाजप नेत्यांवर टीका करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, संबंधित कामाची प्रक्रिया, अतिक्रमणाचा मुद्दा आणि दाखल झालेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर पुढील तपासाकडे लक्ष लागले आहे.


















