- परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आकुर्डी (दि. २३ ऑक्टोबर २०२६) :- जुन्या वादाचा राग मनात धरून करण साठे आणि त्याच्या ८ ते ९ साथीदारांनी दोन तरुणांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. यावेळी एका तरुणाच्या डोक्यात कड्याने आणि सिमेंटच्या पेव्हर ब्लॉकने मारहाण करण्यात आली, तर दुसऱ्या तरुणाच्या डोक्यात आणि पाठीवर धारदार शस्त्राने वार करून त्याच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना २१ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास आकुर्डी येथील एबीसी जंक्शन सोसायटीजवळ घडली.
या प्रकरणी केदार संतोष यादव (वय २१, रा. चिखली गावठाण) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार करण साठे आणि त्याच्या ८ ते ९ साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करण साठे याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी केदार यादव आणि त्याचा मित्र हर्षद पवार यांचा करण साठे याच्यासोबत पूर्वी वाद झाला होता. याच वादातून आरोपींनी दोघांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. जीव वाचवण्यासाठी दोघेही पळून जात असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले.
यावेळी करण साठेच्या एका साथीदाराने हातातील कड्याने केदार यादवच्या डोक्याच्या डाव्या बाजूला मारून त्याला जखमी केले. दुसऱ्या साथीदाराने रस्त्याच्या कडेला पडलेला सिमेंटचा पेव्हर ब्लॉक उचलून केदारला मारला. तर करण साठे याने धारदार व टोकदार शस्त्राने हर्षद पवारच्या डोक्यात आणि पाठीच्या डाव्या बाजूला वार करून त्याच्या हत्येचा प्रयत्न केला. या हल्ल्यात परिसरात दहशत निर्माण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि क्रिमिनल अमेंडमेंट अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गोंधे करीत आहेत.


















