न्यूज पीसीएमसी नेटवर्क
हिंजवडी (दि. २३ ऑक्टोबर २०२६) :- पिंपरी-चिंचवडमधील हिंजवडी परिसरात एका २३ वर्षीय गर्भवती महिलेची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनिता कुमारी गोंड असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी तिचा पती राकेश सागर गोंड (वय ३०) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडीतील कस्तुरी चौक परिसरातील सुखवाणी अंबर कन्स्ट्रक्शन लेबर कॅम्पमध्ये २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ ते २२ ऑक्टोबर रोजी पहाटे १.३० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. अनिता कुमारी गोंड ही गर्भपात होऊ नये म्हणून कापूरमध्ये लवंग टाकून त्याची वाफ घेत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
यावेळी ती अर्धनग्न अवस्थेत खोलीबाहेर येऊन आरडाओरड करत असल्याच्या कारणावरून तिचा पती राकेश गोंड याने तिचा गळा दाबून खून केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी रुपेश शंभू साव (वय ३८, मूळ रा. कैमूर, बिहार) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशन कांदे करीत आहेत. आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे.


















