- एक लाख रुपये रोख पारितोषिक, स्मृतीचिन्ह अन् भेटवस्तुचा मानकरी..
- महाराष्ट्रातील सर्वात मोठी रील स्पर्धेचा परितोषिक वितरण समारंभ दिमाखात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २४ ऑक्टोबर २०२६) :- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे जगातील सर्वांत उंच स्मारक ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’’ आणि निर्माणाधीन भगवा धर्मध्वज यांना ढोल-ताशांच्या ऐतिहासिक विश्वविक्रमी मानवंदना सोहळ्याचे क्षण सर्जनशील रीलच्या माध्यमातून समाजमाध्यमांवर पोहोचविणाऱ्या रील निर्मात्यांच्या हिंदूभूषण स्मारक ट्रस्टतर्फे गौरव करण्यात आला. ट्रस्टतर्फे आयोजित खुल्या रील स्पर्धा–२०२६ मध्ये नाशिक येथील मयूर अहेर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना एक लाख रुपयांची रोख रक्कम, स्मृतीचिन्ह आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून दि.४ ऑक्टोबर रोजी झालेल्या ऐतिहासिक मानवंदना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. त्याची नोंद गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली. त्या सोहळ्यानिमित्त आयोजित ‘ब्लॉकब्लास्टर रील’ स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आणि स्नेहमेळावा शनिवारी (दि. २४ ऑक्टोबर) मोशी येथील सीझन्स बँक्वेट येथे पार पडला. यावेळी कामगार नेते सचिन लांडगे, उद्योजक कार्तिक लांडगे, हिंदूभूषण स्मारक ट्रस्टचे सदस्य प्रतापराव मोहिते, पृथ्वीराज लांडगे, सुहास ताम्हाणे आदी उपस्थित होते.
हिंदूभूषण स्मारक ट्रस्टचे सचिव प्रसाद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रासह अन्य राज्यातील ७५० हून अधिक रील निर्मात्यांनी सहभाग नोंदवला होता. यामुळे हा सोहळा जगभरात पोहाचला. त्यासोबतच महाराष्ट्रभरात शिव-शंभूप्रेमींनी सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद दिला आहे. पारितोषिक वितरण समारंभाला ६०० हून अधिक स्पर्धत उपस्थित राहीले. त्यामुळे हा सोहळा अत्यंत दिमाखात संपन्न झाला. आमदार लांडगे यांनी सर्व पारितोषिक विजेत्या रिल निर्मात्यांचे अभिनंदन केले.
उद्योजक कार्तिक लांडगे म्हणाले की, ‘‘ घरातील आई आणि गोठ्यातील गाई माझ्यासाठी समान पूजनीय आहे’’ या भावनेतून आमदार महेश लांडगे काम करीत आहेत. देव-देश-धर्म आणि संस्कृती जपण्यासाठी प्रखर भूमिका आणि त्याला आयआयएम, सीईओपी, न्यायालय इमारत आणि संविधान भवन उभारणीसाठी त्यांनी यशस्वी पाठपुरावा केला. ‘विकासाभिमूख हिंदुत्वा’च्या या कार्यात सर्व रील निर्माते आणि नेटिझन्सची साथ द्यावी.
पुरस्काराचे मानकरी…
या स्पर्धेत यश कदम यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. त्यांना ७५ हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. तृतीय क्रमांकाचे मानकरी जय गाडे यांना ५० हजार रुपये, चतुर्थ क्रमांक विजेत्या हिंदवी भोसले यांना २५ हजार रुपये, तर पाचवा क्रमांक मिळविणाऱ्या प्रणव यांना १० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. पहिल्या पाचही विजेत्यांना रोख रकमेसह स्मृतीचिन्ह आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. या विजेत्यांना एकूण २ लाख ६० हजार रुपयांची रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली. तसेच, सहभागी सर्व रिल निर्मात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जगातील सर्वात उंच शिल्पाला ढोल-ताशा पथकांच्या मानवंदनेचा सोहळा जगभरात पोहोचवण्यासाठी रील निर्मात्यांनी पुढाकार घेतला. वास्तव आणि सत्य दाखवणारे रील स्टार खऱ्या अर्थाने ‘रिअल स्टार’ आहेत. सशक्त राष्ट्र आणि त्या राष्ट्रातील सशक्त तरुण घडवण्यासाठी, राष्ट्रभक्ती जागृत करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा


















