- डॉक्टर-कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत पोलीस हवालदारावर हल्ला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २४ ऑक्टोबर २०२६) :- वायसीएम रुग्णालयात मध्यरात्री गोंधळ घालणाऱ्या तिघांनी हस्तक्षेप करणाऱ्या पोलीस हवालदाराला धक्काबुक्की करत त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी हवालदार अमोल शिंदे यांची गचुंडी धरून त्यांना बाजूला ढकलले. तसेच हातातील जाड लोखंडी कड्याने मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या झटापटीत शिंदे जखमी झाले आहेत.
शुक्रवार आणि शनिवारच्या मध्यरात्री साडेचारच्या सुमारास यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात हा प्रकार घडला. वैभव साळुंखे, कुशल गोयल आणि सोहेल शेख हे तिघे आपल्या मित्राला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन आले होते. त्यावेळी त्यांनी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत आरडाओरडा सुरू केला. त्यामुळे रुग्णालयातील कामकाजात अडथळा निर्माण झाला.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुढे आलेल्या पोलीस हवालदार अमोल शिंदे यांच्याशीही तिघांनी वाद घातल्याचे समोर आले आहे. त्यांना धक्काबुक्की करून लोखंडी कड्याने मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
















