- रावेतमध्ये महिला सायबर भामट्यांच्या जाळ्यात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रावेत (दि. २४ ऑक्टोबर २०२६) :- ऑनलाइन शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका महिलेची तब्बल ४८ लाख ८८ हजार ८५ रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. रावेत परिसरात हा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी अनोळखी व्यक्तींविरोधात रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ सप्टेंबर २०२६ ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला. आरोपींपैकी विल्यम अॅनालिस्ट नावाच्या व्यक्तीने टेलिग्राम या सोशल मीडिया अॅपवर महिलेला ‘शेअर मार्केट जे-०३’ या ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. त्यानंतर शेअर मार्केटमधील ऑनलाइन गुंतवणुकीबाबत माहिती देत तिचा विश्वास संपादन केला.
आरोपींनी महिलेला ऑनलाइन शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले. त्यांच्या सांगण्यावरून महिलेने विविध बँक खात्यांमध्ये आरटीजीएस तसेच ऑनलाइन माध्यमातून एकूण ४८ लाख ८८ हजार ८५ रुपये जमा केले. मात्र, गुंतवलेली रक्कम परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले.
या प्रकरणात विल्यम अॅनालिस्ट, टेलिग्रामवरील लिंकवर नमूद असलेली अनोळखी महिला आणि कस्टमर केअरच्या नावाने संपर्क साधणाऱ्या अज्ञात व्यक्तींचा समावेश असल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास मपोउपनि आवारे करीत आहेत.
















