- स्वयंपाकघराचे मोठे नुकसान झाल्याचा ग्राहकाचा दावा..
- पत्नीचा हाताही गंभीर भाजला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २५ ऑक्टोबर २०२६) :- ऑनलाइन खरेदी केलेल्या किचन चिमणीला आग लागून स्वयंपाकघराचे मोठे नुकसान झाल्याचा दावा एका ग्राहकाने केला आहे. या दुर्घटनेत आपल्या पत्नीच्या हाताला गंभीर भाजल्याची दुखापत झाल्याचेही ग्राहकाने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी ग्राहकाने Beyond Appliances आणि फ्लिपकार्ट या दोन्ही कंपन्यांकडे नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
ग्राहकाने दिलेल्या माहितीनुसार, फ्लिपकार्टवरून खरेदी केलेल्या चिमणीला १८ ऑक्टोबर २०२६ रोजी नियमित वापरादरम्यान आग लागली. या घटनेत स्वयंपाकघरातील सुमारे ७० टक्के भागाचे नुकसान झाल्याचा दावा त्याने केला आहे. पत्नीच्या हाताला भाजल्याने तिला तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावे लागल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेबाबत इतर ग्राहकांना सावध करण्यासाठी फ्लिपकार्टवर उत्पादनाचा रिव्ह्यू लिहिण्याचा प्रयत्न केला; मात्र तो वारंवार प्रसिद्ध झाला नसल्याचा आरोपही ग्राहकाने केला आहे.
या दुर्घटनेमुळे झालेली शारीरिक दुखापत, घराचे नुकसान, मानसिक त्रास आणि आर्थिक हानी यासाठी संबंधित कंपन्यांनी संपूर्ण नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्राहकाने केली आहे. दरम्यान, या प्रकरणात संबंधित कंपन्यांची अधिकृत बाजू, आगीचे नेमके कारण आणि घटनेची स्वतंत्र पडताळणी झाल्याची माहिती उपलब्ध नाही.

















