- रावेतमधील भोंडवे कॉर्नर येथे वाहतूक पोलिसांच्या तपासणीत प्रकार उघडकीस…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २५ ऑक्टोबर २०२६) :- कारवर अधिकृत परवानगीशिवाय अशोकस्तंभ आणि ‘सरपंच’ असा उल्लेख असलेला लोगो लावल्याप्रकरणी रावेत पोलिसांनी कारचालक आणि वाहनमालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २२ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास रावेत येथील भोंडवे कॉर्नर परिसरात वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास काळ्या रंगाची टोयोटा हॅरियर कार आली. या कारवर अशोकस्तंभाचे चिन्ह आणि ‘सरपंच’ असा उल्लेख असलेला लोगो लावण्यात आला होता.
वाहतूक पोलिसांनी कार थांबवून चौकशी केली. त्यावेळी संबंधित चिन्हे आणि लोगो वापरण्यासाठी चालक व वाहनमालकाकडे अधिकृत परवानगी नसल्याचे तपासात समोर आल्याचे वृत्त आहे.
यानंतर रावेत पोलिसांनी चालक आणि वाहनमालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला. या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे.


















