न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ब वर्गात समावेश झाल्यानंतर सुधारित आकृतीबंधानुसार अद्यापही नोकर भरती झालेली नाही. प्रत्येक विभागात मनुष्यवळाचा तुटवडा जाणवत असून, विविध विभागांकडून होणाऱ्या मागणीनुसार कर्मचारी पुरविताना प्रशासन विभागाची दमछाक होत आहे. ही बाब लक्षात घेत, महापालिका प्रशासनाने विविध ३११ संवर्गातील एकूण २,७६३ पदे भरण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. या प्रस्तावाला “ग्रीन सिग्नल’ मिळताच ही पदे भरली जाणार आहेत.
महापालिकेचा आकृतीबंध तयार करण्यात आला आहे. मात्र, राज्य सरकारने नोकर भरतीला मनाई केल्याने अनेक वर्षांपासून महापालिकेत नोकरभरती झालेली नाही. महापालिका आस्थापनेवर “अ’ ते “ड’च्या संवर्गात ३११ मंजूर असून, त्याअंतर्गत एकूण ९७६३ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ७००० पदे भरलेली असून २७६३ पदे रिक्त आहेत. याशिवाय महापालिका आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्ती व राजीनामा अशा विविध कारणांमुळे दरवर्षी पद रिक्त होण्याचे सरासरी प्रमाण ३०० ते ३२५ एवढे आहे.
नोकर भरतीबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे महापालिका आस्थापनेवरील मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या थांबविण्यात आल्या आहेत. याशिवाय महापालिका अस्थापनेत वर्ग तीन व चार संवर्गातील पदांची मोठ्या प्रमाणावर कमतरता भासत आहे. परिणामी दैनंदिन कामकाजावर त्याचा विपरित परिणाम होत आहे. ही बाब लक्षात घेऊन, महापालिकेच्या नोकर भरतीला मंजुरी देण्याची मागणी या प्रस्तावात केली आहे.











