न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक संयुक्त कृती समिती व महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ सलंग्न भारतीय मजदूर संघाच्यावतीने महाराष्ट्रातील सर्व सुरक्षा रक्षकांची दिनांक १३, शनिवार रोजी पुण्यातील शनिवार पेठ येथील विश्वकर्मा भवन येथे सुरक्षा रक्षक एकत्रीकरण व सुरक्षारक्षकांना भेडसावणाऱ्या समस्या व त्यासंदर्भातील महत्वाचे मुद्दे व यासंदर्भात निर्माण झालेले गैरसमज या बाबींचे निराकरण करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.
शासनाच्या खाकी गणवेश नियमन अंमलबजावणीच्या हालचाली सुरु झाल्या असून, त्या निर्णयाचे सुरक्षा रक्षकांमधे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्यंतरी खाकी गणवेशाबाबत अजून कोणताही निर्णय झाला नाही, अशी एक ध्वनीफित प्रकाशित झाली होती. तसेच एकत्रीकरण म्हणजे नेमके काय? शासनाची एकत्रीकरणाविषयी धोरणे काय आहेत? या व अशा अनेक प्रकारच्या समस्यांचे निराकरण या बैठकीच्या माध्यमातून अॅड. विशाल मोहिते, (सल्लागार समिती) व महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष, विलास कच्छवे यावेळी सुरक्षा रक्षकांना योग्य ते मार्गदर्शन करणार आहेत
याकरीता महाराष्ट्र राज्य व पुणे जिल्ह्यातून सर्व सुरक्षा रक्षक आपल्या समस्या व अडचणी मार्गी लावण्यासाठी बैठकीस उपस्थित राहणार आहेत असे संघटनेच्यावतीने कळविण्यात आले आहे.
या बैठकीस अॅड. विशाल मोहिते, सल्लागार समिती सदस्य, महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक संयुक्त कृती समिती अध्यक्ष, विलास कच्छवे, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ पुणे जिल्हा सचिव, अविनाश मुंढे, शिवकुमार बायस, कार्यध्यक्ष, गंगाधर वाघमारे, उपाध्यक्ष, अमित देशे, सरचिटणीस, मारूती झाडे, सदस्य, नितीन शेंडगे व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.











