न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ३६ व्या वर्धापन दिनानिमित्त शहरात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. निरनिराळ्या क्रीडाप्रकारात महापालिकेचे नगरसेवक, पदाधिकारी, कर्मचारी आदींनी सहभाग नोंदवून खेळाच्या माध्यमातून एक वेगळा ठसा उमटविण्याचा प्रयत्न केला.
विविध क्रीडाप्रकारात विजेता व उपविजेता तसेच प्रशंसनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा यथोचित गौरव व पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला. यावेळी महापौर क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते झाला.
प्रभागात विकासकामांचा धडाका लावणारे नगरसेवक शैलेश मोरे यांना महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते उत्कृष्ट क्रिकेटपटू असा किताब व उपविजेत्या संघाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.
महापौर म्हणाले नगरसेवक शैलेश मोरे यांनी या क्रिकेट स्पर्धेत अष्टपैलू कामगिरीच्या आधारे हा किताब मिळविला असून, ज्याप्रकारे त्यांनी खेळाचे मैदान गाजवले त्याचपद्धतीने आपला प्रभाग ही अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर स्मार्ट करतील व त्यात ते यशस्वीही होतील, अशा शुभेच्या देताना त्यांच्या कामगिरीचे कौतुकही महापौरांनी यावेळी केले.
यावेळी महापौर राहुल जाधव, उपमहापौर सचिन चिंचवडे, नगरसेवक, पदाधिकारी, मनपा अधिकारी, कर्मचारी व प्रभागातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.















