न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारावा, मनपाची शाळा स्मार्ट व्हावी याकरिता महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ दिल्लीतील शासनाच्या शाळेंना भेटी देऊन नुकतेच परतले.
या भेटीदरम्यान तेथील शाळेतील ई-लर्निग, स्मार्ट क्लास, वर्ग व्यवस्था व सुशोभिकरण, उद्यान, क्रीडांगण, ग्रंथालय व वाचनालय, प्रयोगशाळा, स्वच्छतागृह, शिक्षकांचा कक्ष आदी गोष्टींचा शिष्टमंडळाने अभ्यास केला व त्या सोइ-सुविधा महापालिकेच्या शाळेंना कशा पुरवता येतील? याकरीताचा अहवाल महापालिकेस सादर केला आहे.
पिंपरी-चिंचवड शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाला असून स्मार्ट सिटीअंतर्गंत शहरातील पाच शाळा स्मार्ट करण्यात येणार आहेत. परंतू, सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या पदाधिका-यांच्या दाै-यानंतर महापालिका हद्दीतील किमान दहा शाळा प्रायोगिक तत्वावर सुधारण्यात याव्यात, त्या शाळा स्मार्ट व्हाव्यात, त्या शाळांचा दर्जा व गुणवत्ता सुधारावी, याकरिता दिल्ली पॅर्टन राबविण्यात येणार आहे, अशी माहिती महापाैर राहूल जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याकरिता दिल्ली महापालिकेशी सामजंस्य करार करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, मनचे सचिन चिखले आदी पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.