न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- महापालिका हद्दीतील घरोघरचा कचरा संकलित करण्यासाठी व मोशी कचरा डेपोपर्यंत वाहतूक करून डम्पिंग करणेबाबतची निविदा प्रक्रिया सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने राबविली होती.
या कामासाठी पूर्वी दोनच ठेकेदार आठ वर्षाच्या दिर्घ मुदतीसाठी नेमण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शहराच्या एका भागासाठी बी.व्ही.जी. तर दुस-या भागासाठी ए.जी. इनव्हायरो इंफ्रा कंपनी यांना काम मिळालेले आहे. या दोन्ही ठेकेदारांनी पदाधिका-यांशी संगनमत करुन स्वता:च्या सोईच्या अटी शर्तींचा समावेश करुन दरांमध्ये संगनमत करुन निविदा भरल्या होत्या.
याबाबत विरोधी पक्षनेते दता साने यांनी आयुक्त श्रावण हर्डिकर यांना निवेदन दिले असून यात पिंपरी चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा गोळा करणे, तो मोशी येथील कचरा डेपोवर पोहोचविणे या कामाचा कालावधी २०१६ मध्ये संपला असून, असे असतानाही वारंवार निविदा प्रक्रीया टाळून सबंधित अधिकारी व भाजपा पदाधिकारी यांनी आर्थिक हित जोपासत महापालिकेचे आर्थिक नुकसान केले आहे.
त्यामुळे मागील स्थायी समितीचे सदस्य व वाढीव निविदा काढणारे संबंधित अधिका-यावर फाैजदारी गुन्हा दाखल करुन संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणीही विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आयुक्तांकडे केली आहे.