न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे गुरव :- चिंचवड ब्लॉक काँग्रेस कमिटीच्यावतीने पिंपरी चिंचवड शहरातील रस्ते व त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी यावर आयुक्तांनी तात्काळ उपाययोजना योजाव्यात याकरिता आयुक्त श्रावण हार्डीकर यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात वाकड, रावेत, हिंजवडी, रावेत, चिंचवड, सांगवी, भोसरी, काळेवाडी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, चिखली, तळवडे व शहरातील अनेक परिसरात वाहतुक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक रस्त्यावरील एकेरी मार्गामुळे प्रश्न बिकट बनले आहेत. सर्वच ठिकाणी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढलेली असल्यामुळे वाहनांचा खेळखंडोबा होऊन मार्गिका उध्वस्त होण्याच्या दिशेने आगेकूच करीत आहेत.
परिणामी वाहतुकीची वाहतुक कोंडी होऊन अपघात वाढलेले आहेत. याचा स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्ते लहान पण त्यात बस, ट्रक अशी मोठी वाहने, तसेच नोकरी उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने वाढलेली वाहने त्यामुळे तासनतास वाहतुक खोळंबून परिसरातील नागरिकांना, महिलांना, विद्यार्थांना त्रास सहन करावा लागत आहे.
या दररोजच्या वाहतूक कोंडी मुळे जनता त्रासलेली आहे. त्यासाठी महापालिकेने आणि पोलीस प्रशासनाने योग्य ते पाऊल उचलुन योग्य तो मार्ग काढावा. नागरिकांना वाहतुक कोंडीमुळे होणारा त्रास व प्रदुषणावर नियंत्रण प्रस्थापित करून वाहतुकीची समस्या सोडवण्याची मागणी चिंचवड ब्लॉक काँग्रेस कमिटीचे मा. अध्यक्ष संदेश नवले यांनी निवेदनाद्वारे केली आहे.












