न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड :- चिंचवड नवरात्र महोत्सवात साडेतीन शक्तिपीठे, अयोध्येतील नियोजित श्रीराम मंदिर देखावा उभारण्यात आला आहे. तसेच याच ठिकाणी शिवसेना भवनाची भव्य प्रतिकृती उभारण्यात आलेली असून, या प्रतिकृतीचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला.
या भव्य प्रतिकृतीचे उद्घाटन संपर्कप्रमुख बाळा कदम, महिला आघाडी संपर्क प्रमुख वैशाली सूर्यवंशी, खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, जिल्हा महिला संघटिका शादान चौधरी, सुलभा उबाळे, शहर प्रमुख योगेश बाबर, मावळ तालुकाप्रमुख राजू खांडभोर, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे, महिला संघटिका अॅड. उर्मिला काळभोर, सरिता साने, अनिता तुतारे या मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना संपर्कप्रमुख बाळा कदम म्हणाले, “अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणी हे हिंदू हृदयसम्राट आदरणीय बाळसाहेब ठाकरे यांचे स्वप्न आहे. त्यांच्या या स्वप्नपूर्तीसाठी शिवसेना पक्षप्रमुख श्री.उद्धव ठाकरे लवकरच अयोध्येस जाणार आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या अयोध्येतील भव्य श्रीराम मंदीर उभारणीच्या स्वप्नाची मुहूर्तमेढ नवरात्र महोत्सवात देखाव्याच्या रूपाने रोवली आहे. त्याचसोबत आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची स्मृती जागृत ठेवण्यासाठी शिवसेना भवन, दादर याची भव्य प्रतिकृती याठिकाणी उभारली आहे, त्यामुळे खऱ्या अर्थाने शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असणारे काम आमचे जिल्हाप्रमुख करीत आहेत, याचा आम्हाला अभिमान वाटतो.”
या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपस्थित कारसेवकांचा संपर्कप्रमुख बाळा कदम यांच्या शुभहस्ते आदरपूर्वक सन्मान करण्यात आला.