न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली :- चिखली, जाधववाडी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडीची कमतरता भासत होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांना कचऱ्याची विल्हेवाट लावताना अडचणी निर्माण होत होत्या.
या समस्येची दखल घेऊन प्रभागातील नागरीकांकरीता दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सामाजिक कार्यकर्त्या सोनम जांभूळकर व जागृती महिला प्रतिष्ठान यांच्यावतीने मोफत कचरावेचक घंटागाडी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते या घंटागाडीचे उद्घाटन करण्यात आले.
परिसरातील नागरिकांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितले कि, पूर्वी या परिसरात घंटागाडी नियमितपणे घरोघरी येत होती, परंतु संख्या अपुरी असल्या कारणाने बऱ्याचदा घंटागाडी, प्रभागातील कॉलनीत व घरोघरी न येता मुख्य रस्त्यावरच थांबत असे. त्यामुळे येता-जाता नागरीकांकडून कचरा टाकताना, रस्त्यावरच कचरा साचून परिसरात दुर्गंधी पसरत होती. यामुळे नागरिकांना आरोग्याच्या तक्रारींना सामोरे जावे लागत असे.
सोनम जांभूळकर व जागृती महिला प्रतिष्ठानच्या पुढाकारातून या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण होणार असून, घंटागाडी प्रभागा व्यतिरिक्त अन्य ठिकाणी न जाता प्रभागाच्या सेवेकरीता उपलब्ध केल्यामुळे कचरा संकलन व आरोग्याच्या समस्या कायमस्वरूपी सुटणार आहेत.
या उपक्रमाचा प्रत्यक्ष लाभ प्रभागातील नागरिकांना होणार असून आहे, त्यामुळे प्रभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच सोनम जांभूळकर व जागृती महिला प्रतिष्ठानच्या कामाचे कौतुकही होत असल्याचे रवी जांभूळकर यांनी सांगितले.
घंटागाडी उद्घाटनप्रसंगी महापौर राहुल जाधव, सामाजिक कार्यकर्त्या सोनम जांभूळकर, रवी जांभूळकर व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

















