न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी प्रतिनिधी :- सध्या विषाणूजन्य आजाराचे प्रमाण वाढत आहे. गोवर व रुबेला ही याच आजारांपैकी एक आहेत. पल्स पोलिओ प्रमाणेच भारत देश हा गोवर व रुबेला मुक्त करण्याचा संकल्प शासनाने केला आहे. त्यामुळेे पालकांनी १५ वर्षाखालील बालकांना गोवर व रुबेला प्रतिबंधक लसीकरण करून घेण्यात यावे, असे आवाहन स्व. इंदिरा गांधी प्रसूतिगृह व रुग्णालयाच्या परिचारिका मंजुषा इंगळे यांनी केले.
येत्या १४ नोव्हेंबर नंतर राज्यात गोवर व रुबेला प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. या लसीविषयी जनजागृती व माहिती देण्याकरिता आरोग्य विभागाच्या वतीने विविध शाळांमध्ये पालकसभा घेण्यात येत आहेत. या अंतर्गत जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीमध्ये पालकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मंजुषा इंगळे यांनी गोवर व रुबेला आजाराची लक्षणे, घ्यावयाची काळजी, तसेच लसीकरण मोहिमेविषयी पालकांना माहिती दिली.
यावेळी सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका गीता येरुणकर, हर्षा बाठिया, तेजल कोळसे-पाटील, भटू शिंदे, तसेच पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंजुषा इंगळे म्हणाल्या, गोवर हा विषाणूंपासून होणारा संसर्गजन्य आजार आहे. गोवरचे विषाणू शिंकण्या किंवा खोकण्यातून हवेत पसरतात. गोवर झालेल्या रुग्णामध्ये शरीरातील ‘अ’ जीवनसत्वाची मात्रा खूप कमी होते. जीवनसत्त्व ‘अ’ कमी झाल्याने रुग्णाला डोळ्यांचे आजार, अतिसार, न्यूमोनिया, मेंदूज्वर असे आजार होण्याचा संभव असतो. मात्र, गोवर हा विषाणूजन्य आजार असल्याने विशिष्ट असे औषध त्यावर नाही. लक्षणांनुसार त्यावर उपचार केले जातात. गोवर टाळण्यासाठी लसीकरण कार्यक्रमामधून लस दिली जाते.
त्या पुढे म्हणाल्या, रुबेला हाही विषाणूजन्य आजार आहे. या आजाराची लक्षणे ही गोवरसारखीच असतात; परंतु गोवरप्रमाणे तीव्र नसतात. आजारानंतर शरीरातील ‘प्लेटलेट्स’ कमी होणे. नाकातून, आतड्यातून, लघवीवाटे रक्तस्राव होणे, लहान सांध्यांना सूज येणे. विशेषत: हे मोठय़ांमध्ये दिसून येते. ‘लिम्फ नोड’च्या पेशींना सूज येणे.
रुबेला आजार गर्भवती मातेला झाल्यास तिच्या बाळाला गर्भातच धोका होण्याची शक्यता असते. रुबेला रोगाची लागण झालेल्या मातेच्या जन्माला येणाऱ्या बाळास मतिमंदता, बहिरेपणा, मोतीबिंदू, काचबिंदू, बाळाची वाढ खुंटणे, प्लेटलेट्स कमी होणे हे आजार होऊ शकतात. रुबेला या आजाराची लस उपलब्ध असून, वेळेत लसीकरण केल्याने या आजाराची लागण होणे टाळता येते, असेही त्यांनी सांगितले.