न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पिंपरी चिंचवड महापालिकेने भोसरी मतदार संघातील बांधकाम व्यावसायिकांना नोटीसीच्या माध्यमातून अलर्ट केले असून, सदनिकेसंदर्भात ग्राहकांप्रती केलेल्या करारनाम्यातील नमूद तरतुदी, अटी व शर्तीचे पालन करावे अन्यथा महापालिकेमार्फेत गृहप्रकल्पास देण्यात आलेली बांधकाम परवानगी रद्द करण्यात येईल असे नोटिशीत म्हटले आहे. यामुळे बांधकाम व्यावसायिकांत उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.
बांधकाम व्यावसायिकांकडून गृहप्रकल्पातील नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली जात नाही. असे असतानाही महापालिकेकडून व्यावसायिकांना सर्व परवानग्या दिल्या जात होत्या. त्यामुळे विकसकांकडून आश्वासनाची पूर्तता केली जात नव्हती. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक आणि सोसायटीतील नागरिकांमध्ये वारंवार वादविवाद होत असत. यामध्ये तोडगा काढण्यासाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी बांधकाम परवानगी विभागाचा आढावा घेतला.
बांधकाम व्यावसायिकांकडून गृहप्रकल्पातील नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली आहे की नाही, याची तपासणी महापालिकेकडून करण्यात यावी. ज्या विकसकांनी पूर्तता केली नाही, अशा विकसकांना नोटीस देण्यात याव्यात. त्यांचा बांधकाम व्यवसायाचा परवाना रद्द करण्यात यावा, असे आदेश लांडगे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार गेली दोन दिवसांपासून महापालिकेने विकसकांना नोटीस देण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. भोसरी मतदार संघातील सुमारे 25 विकसकांना नोटीस बजाविण्यात आली आहे.