न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या प्राध्यापक नगरसेवकाने सफाई कामगाराच्या थोबाडीत मारल्याची घटना गुरुवारी घडली. याबाबत पोलिसांनी दखलपात्रऐवजी (एफआयआर) अदखलपात्र (एनसी) गुन्हा दाखल केला आहे.
त्यासाठीही सफाई कामगारांना पोलिस चौकीत ठिय्या द्यावा लागला. दोन दिवसांपूर्वीच भाजपचेच नगरसेवक केशव घोळवे यांना चाकण येथे स्थानिक गुंडांनी मारहाण केली होती.गणेश जगताप असे मारहाण झालेल्या कामगाराचे, तर प्रा. उत्तम केंदळे असे मारहाण केलेल्या नगरसेवकांचे नाव आहे.
केंदळे यांच्या प्रभागात औषध फवारणीचे काम जगताप यांना देण्यात आलेले होते. ते काम न करता झाडाखाली अर्धा तास मोबाईलवर बोलत बसल्याने त्याचा जाब केंदळेंनी विचारला. त्यावर उलट उत्तर दिल्याने त्याच्या दोन कानाखाली मारल्याचे केंदळे म्हणाले. गेल्या तीन महिन्यापासून औषध फवारणी न केल्याने प्रभागात साथीचे रोग पसरल्याने त्यांनी सांगितले.










