न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आकुर्डी :- पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीने आज (दि. २६) शुक्रवार रोजी आकुर्डीतील सीबीआयच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सत्ताधारी भाजप सरकार ‘सीबीआय’च्या कामकाजात हस्तक्षेप करीत असून, दबावतंत्राचा अवलंब करून, मनमानी कारभार करीत आहे. पारदर्शक कारभाराच्या आणाभाका घेऊन सत्तेवर आलेले भाजप सरकार देशात हुकुमशाही पद्धत रुजू करीत आहे. असा आरोप पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केला. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
केंद्र सरकारच्या विरोधात देशभरातील ‘सीबीआय’च्या कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीने आज निदर्शने करण्यात येत आहेत. आकुर्डीतील सीबीआयच्या कार्यालयासमोर युवकचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शहराध्यक्ष सचिन साठे, महिला अध्यक्षा गिरीजा कुदळे, युवक अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, सरचिटणीस सजी वर्की, मयूर जयस्वाल, माजी महिला प्रदेशध्यक्षा श्यामला सोनवणे, बिंदू तिवारी, प्रवक्ते गौरव चौधरी, शहाबुद्दीन शेख यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सचिन साठे म्हणाले, “देशाच्या इतिहास पहिल्यांदाच मोदी सरकारच्या राजवटीत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश माध्यमांसमोर आले. सरकार न्याय प्रक्रियेत हस्तक्षेप करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. आता स्वायत्तता संस्था असलेल्या सीबीआयच्या कामकाजात हस्तक्षेप केला आहे. सरकार हुकूमशाही पद्धतीने वागत आहे”
सत्यजित तांबे म्हणाले, “सीबीआयचे संचालक आलोक वर्मा राफेलमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करणार होते. त्यामुळे आपली चोरी उघड होईल याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भीती होती. त्यामुळे त्यांनी अधिकार नसताना मध्यरात्री वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. सीबीआय, रॉ, आयबीआय अशा संस्था संपविण्याचे काम मोदी सरकार करत आहे. सीबीआयच्या संचालकाला काढायचे असेल तर न्यायाधीश, पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते निर्णय घेत असतात. परंतु, मोदी यांनी कोणालाही विश्वाससात न घेता हुकूमशाही पध्दतीने वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. कायदा पायदळी तुडविण्यात आला आहे” असेही तांबे म्हणाले.
‘मोदी सरकार हाय हाय’, ‘भाजप सरकार हाय, नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी’, ‘गली गली मे शोर है, चौकीदार चोर है’ अशा जोरदार घोषणा आंदोलकांनी सरकारच्या विरोधात दिल्या.















