न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली :- दिवाळी म्हटले की, घरोघरी दिवे लागण, विविध प्रकारचे खाद्यपदार्थ व नवनवीन कपडे आदींबाबत उत्साह ओसंडून वाहत असतो. परंतु सर्वांचीच दिवाळी गोड होते हा समज चुकीचा आहे.
परिस्थितीने पिचलेल्या अनाथ, अपंग व निराधार व्यक्तींना या गोड सणाचा लाभ घेता येत नाही. राज्यातील अनेक दुर्गम परिसरात एकवेळ जेवणाची भ्रांत आहे. असा समाज दिवाळी सण तरी कसा साजरा करणार?
समाजसेविका सोनम जांभुळकर व जागृती महिला प्रतिष्ठानच्यावतीने एक सामाजिक भान जपत, तसेच आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली येथील अति दुर्गम भागातील आदिवासी बांधवासाठी दिवाळीनिमित्त एक भेट म्हणून ‘सामाजिक दान’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
उपक्रमास नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला. चिखली, जाधववाडी, आहेरवाडी, मोशी, से. क्र. १३, १६ येथील परिसरातील नागरिकांनी जुने वापरायोग्य कपडे, दिवाळीचा फराळ, साखर, गहू, तांदूळ, बिस्किटे, प्रोटीन पावडर स्वरुपात मदत केली.
ही वस्तूरुपी मदत गडचिरोली येथील आदिवासी बांधवासाठी रवाना करण्यात आली. समाजसेविका सोनम जांभूळकर, रवी जांभूळकर, जागृती महिला प्रतिष्ठान यांच्या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.










