न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भोसरी मतदारसंघात राजकीय व शासकीय वरदहस्ताने शासकीय जागा, रस्त्यालगत बेकायदा शेड मारून ते भाड्याने देण्याचे काम सध्या सुरू आहे. त्याठिकाणी राजकीय गुंड पोसण्याचे काम देखील काही मंडळी करीत आहेत. आळंदी रोड, भोसरी या भागात अशाप्रकारचे नव्याने बेकायदा पत्राशेड उभारण्यात आली आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी, असे लेखी पत्र शिवसेना खासदार आढळराव यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले होते.
चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचे काम महापालिका आयुक्तांकडून सुरू आहे. गेल्या २० ते २५ वर्षांपासून व्यवसाय करणा-यांना जागा देणे अपेक्षित असताना त्यांना नोटीसा दिल्या जात आहेत. नव्या पत्राशेडजवळ स्थानिक गुंड उभे राहून माता-भगिनींची छेडछाड काढतात. नव्याने पत्राशेड उभारून रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे या पत्राशेडवर कारवाईसाठी खासदार आढळराव यांनी आयुक्तांना पत्र दिले होते.
मात्र, आयुक्त हर्डीकर यांच्याकडून जुन्या व्यावसायिकांना नोटीसा देण्यात आल्या. त्यांच्या नोटीसीबरोबर खासदार आढळराव यांच्या पत्रांची झेरॉक्स जोडून वाटण्यात आल्या होत्या. त्यांच्याविषयी बदनामीचा केविलवाणा प्रयत्न राजकीय गुंड व अधिकारी करीत आहेत.
नव्याने उभारण्यात आलेल्या पत्राशेड काढून टाकावे. त्याठिकाणी होणारी लाईट व पाण्याची चोरी थांबवावी, अन्यथा शिवसेनेतर्फे जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट आणि महिला आघाडी जिल्हा संघटक सुलभा उबाळे यांनी दिला आहे.