न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- महापालिकेतीचे विरोधी पक्षनेता दत्ता साने यांनी केलेल्या आरोपाला प्रतीत्युर देताना पक्षनेते एकनाथ पवार यांनी प्रसिध्दीपत्रक काढले असून, बिनबुडाच्या आरोपांची राष्ट्रवादीला सवयच लागली आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पालकमंत्री गिरीष बापट यांच्या माध्यमातून भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे यांनी पाठपुरावा केला. त्याला यश आले असून शहरासाठी पाणी आरक्षित झालेले आहे.
पवना धरणातून ४८.५७६ दशलक्ष घनमीटर, भामा-आसखेड धरणातून ६०.७९ दशलक्ष घनमीटर आणि आंद्रा धरणातून ३८.८७ दशलक्ष घनमीटर असा एकूण १४८.२३६ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षणास शासनाच्या जलसंपदा विभागाने मंजुरी दिली.
तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांनी त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी पाण्याचे राजकारण केले. भामा -आसखेड आणि आंद्रा धरणातील पाणी आरक्षित करूनही त्यांनी पुनर्स्थापना रक्कम राष्ट्रवादीच्या तत्कालीन सत्ताधा-यांना भरू दिली नाही. महापालिका प्रशासनावर दबाव आणून संबंधित रक्कम अदा करण्याच्या कामात विलंब केला. परिणामी पाण्याचे आरक्षण रद्द झाले. असे असतानाही पालिकेतील विरोधी पक्षनेता साने भाजपावर बिनबुडाचे आरोप करीत आहेत.
त्यांच्या सत्ताकाळातच पाणी आरक्षणासाठीची रक्कम संबंधित विभागाकडे वर्ग होणे अपेक्षित होते. मात्र, त्यांच्या नाकर्तेपणामुळे आणि त्यांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या राजकीय स्वार्थामुळे शहरवासीयांच्या हक्काचे पाणी पळविण्याचा डाव आखण्यात आला होता. मात्र, भाजपाने ही खेळी वेळीच ओळखली आणि शहरासाठीचे आरक्षित पाणी मिळविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्याला यशही आले आहे, असे एकनाथ पवार यांनी निवेदनात नमूद केले आहे.










