न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी-प्राधिकरण :- येत्या ३ नोव्हेंबर रोजी निगडितील मदनलाल धिंग्रा मैदानावर मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या निमित्ताने भाजपा आगामी निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून या सभेकडे पाहत आहे.
पक्षाच्या वतीने सभेच्या नियोजनाची जबाबदारी पालकमंत्री गिरीश बापट, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, पक्षनेते एकनाथ पवार यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे. यावेळी सभेच्या निमित्ताने मैदानावरील व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी मदनलाल धिंग्रा मैदानास भेट दिली.
यावेळी आमदार महेश लांडगे, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, आझम पानसरे, पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सदस्य विलास मडिगेरी, सरचिटणीस अमोल थोरात, प्रदेश कार्यकारीणी सदस्य उमा खापरे, नगरसेवक नामदेव ढाके, शितल शिंदे, कार्यकर्ते अमित गोरखे, अनुप मोरे, मा. नगरसेवक विनायक गायकवाड आदी उपस्थित होते.
सभेस मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघातील बारा तालुक्यातून पक्षाचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या सभेला हजेरी लावणार आहेत. सभेची संपूर्ण व्यवस्था मदनलाल धिंग्रा मैदानावर केली असून, ही सभा ऐतिहासिक सभा ठरणार असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले.
यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले की, मदनलाल धिंग्रा मैदान हे पाच एकर जागेवर विस्तारलेले असून, मुख्यमंत्र्यांच्या सभेची पूर्ण नियोजन झाले आहे. बसण्याची प्रशस्त व्यवस्था करण्यात आली आहे. ६५ हजारहून अधिक लोकांची हजेरी लागणार आहे. वाहन तळाची व्यवस्था केली आहे. मैदानावर स्क्रीन लावण्यात येणार आहेत. मैदानाबाहेर स्क्रिन्स लावल्या जाणार आहेत. बाहेरील बाजुवर बसून कार्यकर्त्यांना सभा पाहता येईल, अशी व्यवस्था आहे. ही सभा ऐतिहासिक सभा ठरणार आहे. या सभेमुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांना आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचे बळ मिळणार आहे.