न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची ऑक्टोबर महिन्याची तहकूब सभा आज (दि. ३१ ऑक्टो.) रोजी महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सभा पटलावरील पीएमपीएमएल बसचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
सार्वजनिक वाहतुकीसाठी पीएमपीएमएलच्या एकत्रित भागीदारीने शहरात बससेवा चालू आहे. पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भाजपची सत्ता असूनही १५५० बस खरेदीची प्रक्रिया दोन वर्षे रखडली आहे, त्यामुळे निधी उपलब्ध न झाल्याने बसेस खरेदीला विलंब होत आहे. बस खरेदीसाठी दोन्ही महापालिकांनी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी भूमिका पीएमपी प्रशासनाने घेतली आहे.
पीएमपी “एएसआरटीयू’ या शासनाच्या अंगिकृत संस्थेशी करार करण्यात येणार असून, त्यावर शिक्कामोर्तब झालेले नाही. ९०० बसेस मार्केट फायनान्स मेकॅनिझमनूसार घेण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. बस खरेदीसाठी काही प्रमाणात निधी दोन्ही महापालिकांकडून पीएमपीकडे द्यावा, अशी मागणी पीएमपी प्रशासनाने केली आहे. यावर विरोधी पक्षनेते दत्ता साने व शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी बस खरेदीचा विषय सदस्य प्रस्तावाद्वारे आणला आहे. आयुक्त त्याची अंमलबजावणी करणार आहेत का? असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर देताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, बस खरेदीचा सदस्य प्रस्ताव आहे. तसेच कायदेशीर तपासणी करुन त्याची अंमलबजावणी केली जाईल.
प्रवाशांच्या सोयीसाठी पीएमपीच्या मागणीनुसार लेखा विभागाच्या बस खरेदी तरतुदींमधून ९०० बस खरेदी करून पीएमपीला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या विषयाला महासभेने मंजुरी दिली.