न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी सत्ताधाऱ्यांवर केलेल्या टीकेची दखल घेत एकनाथ पवार यांनी प्रसिध्दीपत्रक काढले असून दत्ता साने यांच्या आरोपांचे खंडन केले आहे.
शहरातील नागरिकांना शास्तीकराचा लाभ मिळवून देण्यासाठी भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे आणि पालकमंत्री गिरिश बापट यांनी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून शास्तीकराचा प्रश्न मार्गी लावला आहे. त्याचा प्रत्यक्ष लाभ दिवाळीनंतर मिळणार आहे. त्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळणार आहे.
मात्र, यातही राजकारण करून दत्ता साने यांनी शहरवासीयांच्या भावनेशी खेळ चालविला आहे. केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सलग पंधरा वर्षे सत्ता असतानाही त्यांना करदात्यांचे हे प्रश्न सोडविता आले नाहीत. त्यामुळे करदात्यांना मोठा मानसिक त्रास आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. हे सर्व टाळण्यासाठी भाजपाने सातत्याने प्रयत्न केला. निवडणुकीत मतदारांना दिलेले आश्वासन भाजपाने पाळले आहे. शहरातील करदात्यांची शास्तीकरातून मुक्तता होणार आहे. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
करदात्यांना दिलासा मिळणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा नाकर्तेपणा समोर आला आहे. पालिकेत सलग दहा वर्षे सत्तेत राहूनही त्यांना करदात्यांना दिलासा देता आला नाही. पालिकेत भाजपाची सत्ता येऊन केवळ दीड वर्ष झाले आहे. असे असतानाही भाजपाने सत्ताधारी म्हणून मतदारांना दिलेले आश्वासन पाळले आहे.
मतदार भाजपाच्या कामगिरीवर समाधानी आहेत. हीच बाब साने यांना खटकत आहे. आपले पद आणि अस्तित्व डळमळीत होण्याची त्यांना सातत्याने भीती वाटत असते. त्यामुळे चर्चेत राहण्यासाठी त्यांच्याकडून बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. मात्र, शहरवासीयांना त्यांची ही ‘कोल्हे कुई’ची सवय चांगलीच माहित झाली असल्याचे एकनाथ पवार यांनी या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.