न्यूज पीसीएमसी नेटवर्क
कासारवाडी :- माजी खासदार अभिनेत्री रेखा गणेशन यांनी दिलेल्या तीन कोटी रुपयांच्या निधीतून पिंपरी-चिंचवडमधील कासारवाडी येथे शाळेची इमारत बांधण्यात येणार आहे. त्या निधीतील २ कोटी २५ लाखाचा निधी महापालिकेला प्राप्त झाला आहे.
शाळेच्या संपुर्ण बांधकामास सुमारे १४ कोटी रुपये खर्च होणार असून, पिंपरी-चिंचवड महापालिका ‘पीपीपी मॉडेल’ची ही शाळा बांधून इंग्रजी माध्यमाच्या या शाळेत मोफत शिक्षण दिले जाणार आहे.
नगरसेवक शाम लांडे यांनी शाळेसाठी निधी मिळविण्यासाठी जोमाने पाठपुरावा केला. त्याचे फळ म्हणून रेखा यांनी तीन कोटी रुपये दिले. लांडे यांच्या प्रभागातच ही सर्व सुविधांनी युक्त अशी शाळा उभी राहत आहे. या पाच मजली शाळेत प्रत्येक मजल्यावर मुले, मुली आणि शिक्षक यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असणार आहे.
तसेच ई लर्निंगसह सर्व सुविधाही असतील. पैशांअभावी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आपल्या मुलांना शिक्षण देऊ न शकणाऱ्या पालकांची या शाळेमुळे मोठी सोय होणार असून त्यांच्या पाल्यांना दर्जेदार इंग्रजी शिक्षण आता मोफत मिळेल, असे नगरसेवक शाम लांडे यांनी सांगितले.