न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पिंपरी चिंचवड महापालिका स्मार्ट धोरणांतर्गत शहरातील केबल नेटवर्क कामाकरीता महापालिकेने २५५ कोटी रुपये खर्चाची निविदाप्रक्रिया राबविली होती. या निविदा प्रकियांतर्गत कामामध्ये रिंग झाली असल्याचे भाजप नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
याआधीही राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणास विरोध केला होता, परंतु त्याकडे सत्ताधाऱ्यांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केले होते. सत्ताधारी पक्षाच्याच नगरसेवकाने अशा प्रकारची हरकत घेतली असल्यामुळे, महापालिकेचा कारभार सर्वच काही पारदर्शक पद्धतीने होत नसल्याचा दिसून येत आहे.
विशेष म्हणजे ज्या कंपनीची या कामासाठी निवड झाली आहे, ती कंपनी नागपूरमधीलच असून, एल अॅन्ड टी हे या कंपनीचे नाव आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कारभारात प्रत्यक्ष नागपूरहून हस्तक्षेप होत असल्याची चर्चा सध्या शहरात सुरु आहे.
भाजपचा अजेंडा पारदर्शक कारभाराचा असून, या प्रकरणामुळे पक्षाची व पर्यायाने महापालिकेची प्रतिमा मालिन होऊ शकते, त्यामुळे आयुक्तांनी ही निविदा रद्द करून फेरनिविदा मागवावी, अशी मागणी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी आयुक्तांकडे केली आहे.