न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १४ नोव्हें) :- नगरसेविका सुनिता वाडेकर यांच्या वॉर्डस्तरीय निधीतून प्रभाग क्रमांक ८ औंध-बोपोडी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक बुद्धभुषण विहाराशेजारील गणेशनगर, बोपोडी या वसाहतींमध्ये तसेच सर्वे नंबर २५ बाराथे चाळ, विठ्ठल मंदिराशेजारील चाळीत नवीन ड्रेनेज पाईपलाईन बसविण्यात आली आहे.
या परिसरात गेली कित्येक वर्षांपासून नागरिकांना शौचालयाचा मैला वाहून नेणाऱ्या लिकेज पाईपलाईनचा त्रास सहन करावा लागत होता. याची दखल घेत नगरसेविका सुनिता वाडेकर यांनी महापालिकेकडे या कामाचा पाठपुरावा केला होता.
महापालिकेने तात्काळ या ठिकाणी मैला वाहून नेणाऱ्या नवीन ड्रेनेज पाईपलाईनचे काम पूर्ण केले असून, या परिसरात सिमेंट काँक्रेटच्या रस्त्याचे कामही मार्गी लावले आहे. परिसरातील नागरिकांनी या विकासकामांमुळे समाधान व्यक्त केले आहे.










